कधी खाल्लीत का निळी केळी?

सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात निळी केळी दिसत आहेत. केळे हे अतिशय उत्तम फळ आहेच पण सर्वाना सहज परवडणारे, शक्तीदायक, अनेक खनिजांनी समृध्द, बारा महिने मिळणारे असे हे फळ आहे. आपल्याकडे कच्ची केळी हिरवी तर पिकलेली केळी पिवळी असतात. केरळ सारख्या भागात लाल केळी मिळतात. पण निळी केळी आपण कधी पाहिलेली नाहीत अथवा त्याबद्दल काही ऐकलेले नाही.

रिपोर्ट नुसार भारतात ज्या पद्धतीने केळी बागा केल्या जातात त्याच पद्धतीने निळ्या केळ्यांचे उत्पादन घेतले जाते. या केळीची झाडे ६ मीटर उंच असतात आणि त्यांना दीड ते दोन वर्षात केळी लागतात. ही केळी जगात अनेक नावाने ओळखली जातात. फिजी मध्ये या केळ्यांना हवाईयन बनाना, हवाई मध्ये आयस्क्रीम बनाना, फिलीपिन्स मध्ये क्रि किंवा ब्ल्यू जावा बनाना म्हटले जाते. शिवाय को केरी, हवाई केळे अशीही त्यांची नावे आहेत.

हे केळे सात इंचापर्यंत मोठे असू शकते. या केळ्यांची शेती टेक्सास, फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, लुईसीयाना मध्ये केली जाते. हे केळे चवीला व्हॅनीला आयस्क्रीम सारखे लागते असे म्हणतात. दक्षिण पूर्व आशियात सुद्धा काही ठिकाणी या केळ्यांच्या बागा आहेत. कमी तापमान आणि थंड प्रदेशात हे पिक चांगले येते.