होळी कृष्णनगरीतील

देशभरात होळीचा सण साजरा केला जात आहे. होळीची भारतीय परंपरा कृष्णकाळापासून असल्याचे मानले जाते आणि त्यामुळे कृष्णनगरी वृंदावन, मथुरा, नंदगांव आणि बरसाण येथे हा उत्सव दोन आठवड्यांपर्यंत साजरा केला जातो. होळीची खरी मजा अनुभवायची असेल तर या नगर्‍यांना भेट द्यायला हवी. येथील होळी उत्सवासाठी अक्षरशः लाखोंच्या संख्येने पर्यटक या गावाना भेट देतात. केवळ भारतीयांनाच हा मोह होतो असे नाही तर अनेक परदेशी पर्यटकही मुद्दाम होळीसाठी या गावात दाखल होत असतात.

या गावातून साजरी होत असलेली होळी केवळ हौसमौज म्हणून साजरी होत नाही तर त्यात असतो प्रेमभाव, श्रद्धा, थोडी थट्टा मस्करी आणि परस्पर विश्वासाचे अतूट नाते. राधा कृष्णाच्या अनोख्या नात्याचा याला संदर्भ आहे. कृष्णभूमी वृंदावन येथील बांके बिहारी मंदिरातील होळी खास असते. येथे पुजारीच कोरडे रंग मंदिराबाहेर जमलेल्या भाविकांवर उधळतात, एकमेकांच्या गळ्यात फुलाच्या माळा घातल्या जातात, जोरदार आवाजात गाणी गाईली जातात, मिठाई भरविली जाते आणि भक्तीचा हा अपूर्व सोहळा स्त्रीपुरूष असा कोणताही भेद न मानता साजरा होतो.

होळीची परंपरा कशी सुरू झाली याची हकीकत अशी सांगितली जाते की कृष्ण सावळा. मात्र राधा गोरीपान. कृष्णाला राधेच्या रंगाचा फार हेवा वाटायचा आणि माता यशोदाकडे तो त्यासंदर्भात तक्रार करायचा. तेव्हा यशोदेनेच कृष्णाला तुला हवा तो रंग राधेच्या तोंडाला लाव असा सल्ला कृष्णाला दिला आणि होळीची सुरवात झाली. राधा मुळची बससाणा गावची. कृष्ण आणि त्याचे गोप या गांवी जाऊन तेथील गोपींना चिडवत आणि त्यांना रंग फासत. मग या गोपीही त्यांना लाठीचा प्रसाद देत. त्यामुळे येथील होळीला लठमार होळी म्हणून ओळखले जाते. नंदगाव आणि बरसाणा गावातील लोक आजही ही परंपरा पाळतात.

कृष्णनगरीत आजही ही प्रेमाची भावना होळीच्या वेळी तेथील हवेतच जणू भरून राहिलेली असते. अनेकविध रंगांनी आकाशात जणू इंद्रधनुष्य साकारले जाते आणि भूमीवर रंगात रंगलेली मंडळी निराळ्याच तंद्रीत या सणाची मजा अनुभवत असतात. ब्रजभूमीतील गुलाल कुंड या सुंदर तळ्याकाठीही अशीच होळी खेळली जाते. होळीचा हा अभूतपूर्व सोहळा प्रत्येकाने किमान एकदातरी अनुभवायला हवा.

Leave a Comment