येथे झाले होते पहिले होलीकादहन


होळी पोर्णिमेला होळी पेटविण्याची परंपरा भारतात सर्वत्र असली तरी त्याची सुरवात मात्र बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील सिकलीगढ धरहरा या गावापासून झाल्याचे अनेक संदर्भ श्रुती तसेच पुराणातून मिळतात. आजही मोठ्या संख्येने म्हणजे ५० हजारांपेक्षा जास्त श्रद्धाळू येथे येऊन राख आणि मातीने होळी साजरी करतात.

पुराणातील उल्लेखांप्रमाणे विष्णुचा चौथा अवतार नरसिंह धरहरा येथे झाला. सिकलीगढ हा हिरण्यकश्यपूचा किल्ला होता. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद विष्णुचा भक्त होता व त्यामुळे हिरण्यकश्यपू चिडलेला असे. त्याने प्रल्हादाला तुझा देव या खांबात आहे काय असे विचारताच प्रल्हादाने होय असे उत्तर दिले होते व त्यावर हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारून तो पाडला तेव्हा त्यातून अक्राळविक्राळ नरसिंह बाहेर आला व त्याने हिरण्यकश्यपूचा वध केला ही कथा आपण जाणतो. नरसिंह बाहेर पडला तो माणिक्य स्तंभ येथे आजही पाहायला मिळतो. १२ फूट रूंदीचा व ६५ अंशात झुकलेला हा प्रचंड खांब आहे.

धरहरा येथेच होलिकाने प्रल्हादाला घेऊन आगीत बैठक मारली होती मात्र त्यात होलिका पूर्ण जळाली पण प्रल्हाद मात्र सुखरूप बाहेर आला. तेव्हापासून येथे होलिका दहनाची परंपरा पाळली जाते. त्यानंतर लोकांनी याच राखेचे व मातीचे मिश्रण करून होळी खेळली म्हणजेच राख व माती एकमेकांना लावली व त्यातून ही परंपरा सुरू झाली. गोरखपूरच्या गीता प्रेस च्या भागवत पुराणातही माणिक्य स्तंभाचे उल्लेख आहेत.

Leave a Comment