पाकिस्तानात झाली होती होलिका दहनाची सुरवात

prahalld
आज देशभरात होळी पर्व साजरे केले जात आहे. सायंकाळी होलिका दहन केल्यावर रंगोत्सव सुरु होईल. पण भारतात मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहाने साजरा केल्या जात असलेल्या या उत्सवाची सुरुवात पाकिस्तानात झाली होती याची माहिती अनेकांना नसेल. अर्थात त्यावेळी पाकिस्तान हा भारताचा भाग होता पण फाळणी झाली तेव्हा हे स्थान पाकिस्तानात गेले.

होळीचा संबंध हिंदू देवता विष्णूच्या नरसिंह अवतार आणि त्याचा भक्त प्रल्हाद यांच्याशी आहे. मुलतान हे पाकिस्तानातील ठिकाण नरसिंह अवतार झालेले ठिकाण आहे. येथे हिरण्यकश्यपू नावाचा दैत्य राज्य करत होता आणि त्याचा मुलगा प्रल्हाद विष्णू भक्त होता. याचा हिरण्यकश्यपूला भयंकर राग होता. हिरण्यकश्यपूने महादेवाकडून मृत्यू न येण्यासाठी वर घेतला होता आणि त्याचा नाश करण्यासाठी हा वर मोडला जाणार नाही अश्या स्वरूपातील नरसिंह अवतार विष्णूने घेतला. तो ज्या खांबातून प्रकटला तेथे भक्त प्रल्हादाने मंदिर बांधले त्याला प्रल्हादपुरी मंदिर असे म्हटले जाते.

narsinh
नरसिंह प्रकट झाल्यावर प्रल्हादाने येथे दोन दिवस होलिका दहन उत्सव साजरा केला आणि त्यानंतर ९ दिवस होळी साजरी केली होती असे वर्णन पुराणात येते. भारतात बाबरी मशीद पडली तेव्हा हे मंदिर पाकिस्तानात पाडले गेले आणि आता ते भग्नावस्थेत आहे. मात्र या मंदिरातील नरसिंह मूर्ती बाबा नारायणदास बात्रा यांनी मोठ्या हुशारीने मुलतान येथून हरिद्वारला आणली होती आणि ती मंदिरात स्थापन केली गेली आहे. नारायणदास बात्रा हे मोठे साधू होते आणि त्यांनी अनेक शाळा, कॉलेज सुरु केली आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान पूर्वीच केला आहे.

Leave a Comment