सकाळी नाश्ता करण्याचे महत्त्व सगळ्यांना माहीत असले, तरी कित्येकांची अवस्था कळते; पण वळत नाही अशी असते. दररोज सकाळी न चुकता हेल्दी नाश्ता करणे म्हणजे निरोगी आयुष्याची सोय करून ठेवणे आहे.
दिवसाची सुरुवात योग्य आणि हेल्दी नाश्त्याने
दिवसाची सुरुवात आपण योग्य आणि हेल्दी अशा नाश्त्याने करायला हवी याबाबत कोणाचे दुमत नसेल. असे असले, तरीही बरेच जण सकाळचा नाश्ता नीट घेत नाहीत. त्यामागचे एक कारण म्हणजे काही लोकांना या वेळेस भूकच लागत नाही. काही लोक कॅलरी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वेळच मिळत नाही, या सबबीवर नाश्ता करत नाहीत. खर तर उत्तम आरोग्य हवे असेल आणि वजन आटोक्यात ठेवायचे असेल, तर सकाळच्या हेल्दी नाश्त्याला पर्याय नाही.
सकाळच्या नाश्त्याचे फायदे
१. चयापचय सुधारते : सकाळी सकाळी योग्य अन्न खाल्ल्याने आपले चयापचय किंवा मेटाबोलिझम चांगले राहाते. यामुळे शरीर उत्साही राहाते. सकाळी काही खाल्ले नाही, तर मेंदूला चुकीची सूचना मिळते आणि शरीर कॅलरी राखून ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे चयापचय दिवसभरासाठी मंदावते.
२. अभ्यासात लक्ष लागणे : शाळेत जाणारी बरीचशी मुले, विशेष करून जी सकाळी लवकर शाळेत जातात, त्यांना नाश्ता करून जाण्याची सवय नसते. मग, ही मुले घाईगडबडीत एखादा कप दूध पिऊन शाळेत जातात. अशी मुले शाळेतील अभ्यास नीट आत्मसात करू शकत नाहीत. यासाठी मुलांनी रात्री थोडे लवकर झोपून आणि सकाळी थोडे लवकर उठून काहीतरी नाश्ता करून शाळेत गेले पाहिजे.
३. नाश्ता केल्याने दिवसभराचा मूड चांगला राहातो : सकाळच्या हेल्दी नाश्त्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहाते आणि त्यामुळे दिवसभर मूड चांगला राहातो.
४. वजन नियंत्रणात राहाते : हेल्दी नाश्त्याने वजन नियंत्रणात राहू शकते; कारण त्यामुळे आपले चयापचय सुधारत असते.
५. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय रोगापासून लांब राहाणे शक्य होते : वजन नियंत्रणात राहिले आणि रक्तातील साखरेचे व्यवस्थित चयापचय झाले, तर मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय रोगापासून लांब राहाणे शक्य होते.
नाश्ता कसा असावा?
तेलकट तुपकट नको, पारंपारिक पद्धतीचा उदा. उपमा, पोहे, इडली, जास्त हेल्दी नाश्ता हवा असेल, तर ओट्स, दलिया, सोया, सुजी, मोड आलेले मूग वाफवून किंवा त्यांचे धिरडे तसेच मिश्र पिठाचे धिरडे असा नाश्ता करावा. नुसती फळं खाणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. अंडं किवा टोफू सँडविच; पण ते व्हीट ब्रेड बरोबर खाणे हा देखील उत्तम पर्याय आहे. नाश्त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवणे आवश्यक आहे. आपण रोजच आपल्या कामासाठी किंवा शाळा, क्लाससाठी धावत असतो. अशावेळी आपल्या व्यग्र आयुष्यात थोडा वेळ स्वतःसाठी नक्कीच द्यायला हवा. आपण जेवायला वेळ देतोच; पण नाश्ता हे दिवसातले सगळ्यात महत्त्वाचे अन्न असल्यामुळे त्याच्यासाठी खास वेळ काढणं फार गरजेचं आहे.