किती प्रकारे घाबरतो माणूस?


जन्मजात बालकापासून ते अगदी वयोवृध्दांपर्यंत सर्वांना भीती ही भावना असतेच. जन्माबरोबरच कदाचित भीतीचा जन्म होत असावा. एखाद्या गोष्टीची भीती वाटणे यात अनैसर्गिक कांही नाही मात्र ठराविक गोष्टींची निष्कारणच भीती वाटत असेल तर त्याला फोबिया असे म्हटले जाते. यात माणसाला अगदी साध्यासाध्या गोष्टींचीही भीती वाटते. त्या संदर्भात कांही फोबियांची ही माहिती

कॅलिगायनेको फोबिया- फोबियाचा हा प्रकार क्वचित आढळतो व हा प्रकार पुरूषांतच असतो. यात पुरूषांना स्त्रीची भीती वाटते. म्हणजे अगदी सुंदर स्त्रियांचीही त्यांना भीती वाटते. ते महिलांशी बोलायला लाजतात, संकोचतात. सुंदर महिलांपासून कांहीही करून दूर गेले पाहिजे अशी भावना त्यांच्या मनात साठते. यालाच वेनुस्ट्राफोबिया असेही म्हणतात. अशा पुरूषांना सुंदर स्त्री जवळ आली की घाम फुटतो, श्वास अडखळतो, हृदयाची धडधड वाढते व त्यांचा जीव घाबरा होतो. या पुरूषांना महिलांची भीती वाटली तरी त्यांच्या मनात तिरस्काराची भावना मात्र नसते.


ओम्फेलो फोबिया- यात माणसाला बेंबीची म्हणजे नाभीची भीती वाटते. हे लोक स्वतःच्या बेंबीला स्पर्श करण्यासही घाबरतात.

स्पेक्ट्रोफोबिया – यात माणसे आरशाला घाबरतात. आरसा ही त्यांना दुसर्‍या जगातील वस्तू वाटते. यातलाच पुढचा प्रकार म्हणजे कांही लोक आरशात स्वतःची प्रतिमा पाहायलाही घाबरतात.


पोगोनो फोबिया – यात माणसे दाढी पाहून घाबरतात. मानसतज्ञांच्या मते या भीतीचे मूळ बालपणात दडलेले असते. बालपणात आलेला एखादा वाईट अनुभव अगर भीतीदायक गोष्ट त्यासाठी कारणीभूत ठरते. हे लोक सांता क्लॉजच्या दाढीलाही घाबरतात


नोमोफोबिया- फोबिया किंवा भीतीचा हा प्रकार अलिकडचा आहे. २००८ साली या फोबियाची लक्षणे समोर आली आणि आज जगात खूप लोक या फोबियाची शिकार आहेत. यात मोबाईलपासून दूर जाण्याची भीती माणसाला पछाडते. ही माणसे मोबाईलचा सिग्नल जाईल, बॅटरी संपेल, मोबाईल हरविणार तर नाही या चिंतेने सतत भीतीखाली असतात.


सोम्निफोबिया- या फोबियाची शिकार बनलेल्यांना आपण झोपेत मरणार याची भीती वाटते. झोपल्यावर भीतीदायक स्वप्ने पडतात म्हणून हे झोपायलाच घाबरतात.तर कांही जण झोपल्याने आपला वेळ वाया जाईल म्हणून झोपायचे टाळण्याचा प्रयत्न करतात.


कॉलरीफोबिया- यात जोकरची माणसाला भीती वाटते. हा फोबिया सर्वसामान्य आहे व तो लहान मुलांत अधिक आढळतो. कालांतराने तो कमी होत जातो. जोकरचा मेकअप विचित्र असतोच पण तो वेगवगळे चेहरे करून हसविण्याचा प्रयत्न करतो व अनेक मुलांना हसू येण्याऐवजी त्याची भीती बसते. कांही जण मोठे झाल्यानंतरही त्यांची ही भीती जात नाही.

Leave a Comment