उन्हाळ्यात घरे थंड ठेवणारा कागद तयार


पाहता पाहता थंडी सरून उन्हाचे चटके बसू लागले आहेत. उन्हाळ्यात सूर्य जणू आग ओकतो त्यामुळे घरे, इमारती तापतात, रस्ते तापतात , हवा गरम होते आणि असह्य उकाडा व घामाने जीव हैराण होतो. त्यावर उपाय म्हणून पंखे, कूलर, एसी, वाळ्याचे पडदे यांचा वापर केला जातो. पण अमेरिकेच्या कोलोरॅडो विद्यापीठातील रोंगुई यँग व जियोबो यिन या दोघा संशोधकांनी असा कागद तयार केला आहे जो इमारती, घरे थंड करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या कागदाचा वापर केला तर बाहेरच्या तापमानापेक्षा घरातील तपमान २० डिग्रीने कमी राहते असा त्यांचा दावा आहे.

हा कागद इमारतींची तसेच बैठ्या घरांची छते, दरवाजे, खिडक्यांवर लावायचा आहे. प्लॅस्टीक रॅप सारखा हा कागद रेडिएटिव्ह कूलिंग प्रोसेस नुसार काम करतो. त्यासाठी वीजेचा खर्च येत नाही. घरात, कार्यालयात कुठेही तो वापरता येतो. कांही रासायनिक पदार्थांच्या मिश्रणात काचेचे तुकडे मिक्स करून तो तयार केला गेला आहे. त्यावर एक चंदेरी लेप आहे. त्यामुळे सूर्यकिरणे परावर्तित केली जातात.

एखाद्या घरासाठी असा २० चौरस मीटर कागद फिल्म वापरली तर घराचे तापमान ४० डिग्रीवरून २० डिग्रीवर येते असा या संशोधकांचा दावा आहे. १ चौरस मीटर कागदासाठी ५० अमेरिकन सेंट अशी त्याची किंमत ठेवली गेली आहे.

Leave a Comment