या राज्याने कोरोना काळातही सार्वजनिक ठिकाणी होळी खेळण्यास दिली परवानगी


नवी दिल्ली : कोरोनाचे रुग्ण देशात वाढत असल्यामुळे कडक निर्बंध अनेक ठिकाणी लादले जात आहेत. कोरोनाची स्थिती बिकट होत असल्याने केंद्रीय गृहमंत्रालयानेही काळजी घ्यायचे आवाहन केले आहे. होळी साजरी करण्यावर महाराष्ट्रासह बहुतेक राज्यांमध्ये निर्बंध आहेत. पण अशात एका मुख्यमंत्र्यांनी मात्र सार्वजनिक होळीला परवानगी द्यायचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक ठिकाणी होळी खेळण्यास राजस्थानमधील गहलोत सरकारने परवानगी दिली आहे. होळी आणि शब-ए-बारातचे सार्वजनिक ठिकाणी आयोजन करण्यास मंजुरी दिली आहे. ही परवानगी 28-29 मार्चला संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. आयोजनस्थळी जास्तीत जास्त 50 जणांना उपस्थित राहण्याची मुभा असणार आहे. राजस्थान गृहखात्याने सुधारित आदेश जारी करत ही माहिती दिली आहे.

सार्वजनिक ठिकाणी होळी आणि शब-ए-बारात आयोजनावर नवा आदेश जारी करण्यापूर्वी बंदी घालण्यात आली होती. नागरिकांना घरीच होळी आणि शब-ए-बारात साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले होते. पण आता सरकारने नव्या नियमावलीसह ही बंदी मागे घेतली आहे. जनता आणि सामाजिक संघटनांचा रोष पाहता सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

दुपारी 4 नंतर होळी खेळण्याची सरकारने मंजुरी दिल्याने सार्वजनिक ठिकाणी आयोजनाचा काहीही उपयोग होणार नाही. होळीचे रंग सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत खेळले जातात. त्यामुळे या मंजुरीचा तसा उपयोग होणार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गृहखात्याने सरकारचा निर्णय झाल्यानंतर सर्व कलेक्टर आणि जयपूर-जोधपूर पोलीस आयुक्तांना सुधारित आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे राजस्थान महामारी अधिनियम 2020 आणि आपतकालीन प्रतिबंध अधिनियम 2005 या कायद्याची टांगती तलवार नसणार आहे. या आदेशामुळे आता सार्वजनिक ठिकाणी होळी आणि शब-ए-बारात साजरी करता येणार आहे.