टीम इंडियाचे इंग्लंडसमोर 337 धावांचे आव्हान


पुणे – टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील पहिल्या एकदिवसीय सारखा इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. टीम इंडियाने केएल राहुलचे शानदार शतक तसेच कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंतच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर 50 षटकांत 6 बाद 336 धावांचा डोंगर उभारला आहे. आता विजयासाठी इंग्लंडला 337 धावांची गरज आहे.

नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या सामन्यात शानदार खेळी करणारा सलामीवीर शिखर धवन अवघ्या चार धावांवर बाद झाला तर रोहित शर्मा देखील 25 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने राहुलसोबत शतकी भागीदारी करत डाव सावरला. कोहली 66 धावांवर बाद झाला.

राहुलने दुसरीकडे शानदार खेळी करत आपले शतक पूर्ण केले. त्याने 114 चेंडूत 108 धावा केल्या. त्याने या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर ऋषभ पंतने आक्रमक पद्धतीने खेळी करत अवघ्या 40 चेंडूत 77 धावांची खेळी केली. त्याने सात षटकार आणि तीन चौकारांसह आपली खेळी साकारली. यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने देखील चार षटकारांसह 16 चेंडूत 35 धावा ठोकल्या. क्रुणाल पांड्यानेही 12 धावांचे योगदान दिले.