राजामौलीच्या ‘RRR’मधील राम चरणचा लुक जारी


दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या बाहुबली या चित्रपटानंतर ‘RRR’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांची उत्कंठा वाढवत आहे. अशातच या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या राम चरणच्या वाढदिवसाच्या मुहर्तावर या चित्रपटाचा न्यु लुक रिलीज करण्यात आला आहे. उद्या 27 मार्च रोजी दक्षिणात्य अभिनेता राम चरणचा वाढदिवस आहे.

शुक्रवारी दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि त्यांच्या टीमने RRR चित्रपटाचा न्यु लुक रिलीज केला आहे. या चित्रपटात राम चरण अल्लूरी सीता रामाराजूची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा जबरदस्त लुक पाहून चाहत्यांच्या उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज राम चरणच्या या शानदार लुकवरून घेतला जावू शकतो. राम चरणने या पोस्टरमध्ये नारंगी धोती परिधान केली असून हातात धनुष्य घेवून आकाशाच्या दिशेने बाण रोखलेला असल्यामुळे राम चरणच्या व्यक्तिरेखेबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


राम चरणचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडत असून राम चरणने आतापर्यंत अशा प्रकारची भूमिका साकारलेली नसल्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून राम चरण चाहत्यांना एका वेगळ्या पेहरावत पाहायला मिळणार आहे. एस. एस. राजामौली यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून RRR चा न्यु लूक शेअर केला आहे. त्याने याला ‘शौर्य, सन्मान आणि अखंडतेचा नायक. आरआरआर चित्रपटातील अल्लूरी सीतारामा राजूला सर्वासाठी घेवून येत आहे, असे कॅप्शन दिले आहे.

दक्षिणात्य अभिनेता राम चरण सोबतच या चित्रपटात बॉलिवूडचा सिंघम अर्थात अजय देवगन, अभिनेत्री आलिया भट्ट, समुथिरकानी आणि एलीसन डूडी यासारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. त्यामुळे गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये या चित्रपटात चर्चा सुरू आहे. हा बहुचर्चित चित्रपट 13 ऑक्टोबर 2021 रोजी सर्व चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.