तब्बल ४९७ दिवसांनंतर परदेश दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली – आज बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ढाक्याला रवाना झाले असून जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील ४९७ दिवसांपासून पंतप्रधानांनी एकही परदेश दौरा केला नव्हता. मोदींनी यापूर्वी नोव्हेंबर २०१९ मध्ये ब्राझीलचा दौरा केला होता. मोदींनी मागील वर्षी जगभरातील वेगवेगळ्या संस्थांच्या आणि महत्वाच्या कार्यक्रमांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. गुरुवारी बांगलादेशने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान नवी दिल्ली आणि ढाका दरम्यान किमान पाच सहमती करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याची शक्यता आहे.

बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सुवर्ण जयंती समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहे. तसेच बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यातही ते आज सहभागी होणार आहे. २६ आणि २७ मार्चच्या आपल्या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान दोन्ही देशाच्या प्रतिनिधिकांच्या उपस्थितीमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमेन यांनी सामंजस्य करारांची संख्या कमी जास्त होऊ शकते पण किमान पाच करारांवर स्वाक्षऱ्या होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

गुरुवारी या दौऱ्यासंदर्भात बोलताना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण गहन चर्चा करणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते. मागील वर्षी सुरु झालेल्या कोरोनाच्या साथीनंतर आपला पहिलाचा परदेश दौरा हा मित्र राष्ट्रामध्ये असल्याबद्दल मोदींनी समाधान व्यक्त केले आहे. कोरोनानंतरचा हा पहिलाच दौरा एका अशा मित्रराष्ट्रामध्ये आहे, ज्याच्याशी भारताचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे म्हणत मोदींनी या दौऱ्याकडून बऱ्याच अपेक्षा असल्याचे संकेत दिले आहेत. शेजाऱ्यांना प्रथम प्राधान्य या भारताच्या धोरणामध्ये बांगलादेश महत्वाचा असल्याचेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बांगलादेशमधील मंदिरांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. ५१ शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या प्राचीन जशोरेश्वरी काली मंदिरामध्ये देवी कालीची पुजा करण्यासाठी मोदी मंदिरात जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.