महाराष्ट्रात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी


मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची वाढलेली संख्या लक्षात घेता विनाकारण होणारी गर्दी टाळणे, वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखणे यासाठी काही कडक उपाययोजना लागू करण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे. त्याचबरोबर या निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने रविवारी (दिनांक 28 मार्च 2021) रात्रीपासून संपूर्ण राज्यात जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

शुक्रवारीच मदत व पुनर्वसन विभागाकडून सदर सूचनेसंबंधीचे स्वतंत्र आदेश निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते.

व्हिडीओ कॉन्फरेंसिंगच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ दीपक सावंत,मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि इतरही अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.