कृषि कायद्यांविरोधातील आंदोलनाला चार महिने पूर्ण; शेतकऱ्यांकडून आज भारत बंदची हाक


नवी दिल्ली – कृषि कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली असून देशभरातील अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिमाण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कृषि कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या आंदोलनाला आज चार महिने पूर्ण झाले असून शेतकऱ्यांकडून याच पार्श्वभूमीवर भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून सकाळीच गाझीपूर सीमेवर राष्ट्रीय महामार्ग ९ रोखण्यात आला होता.

आंदोलक शेतकऱ्यांकडून दूध तसेच भाज्यांचा पुरवठाही रोखण्यात येईल, असे संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल यांनी सांगितले आहे. दरम्यान शेतकऱ्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन किसान मोर्चाने केले असून बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारले आहेत.

भारत बंद आंदोलनाला सकाळी सहा वाजता सुरुवात झाली असून आंदोलन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहील, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे. राजधानी दिल्लीतही बंद पाळला जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर शेतकरी उतरणार आहेत. भारत बंददरम्यान मार्केट तसेच वाहतूक सेवा बंद असेल, असं ज्येष्ठ शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले होते. दुसरीकडे आपण बंदमध्ये सहभागी नसून मार्केट सुरु राहतील, असे देशातील आठ कोटी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने जाहीर केले आहे.