निमलष्करी दलातील ‘रायफल महिला’

भारतीय सेनेच्या निमलष्करी दलात तसेच सशत्र दलात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत चालला असून सीमाभागात सुद्धा या महिला घुसखोरी रोखणे, गस्त घालणे आणि दहशद्वाद्यांशी मुकाबला करण्यात पुरुष सैनिकांच्या बरोबरीने कामगिरी पार पाडत आहेत. आसाम रायफल्स मध्ये अश्या २०० रायफल महिला कार्यरत असून म्यानमार सीमेच्या रक्षणासाठी सज्ज आहेत.

आसाम रायफल्सचा १३६ वा स्थापना दिवस साजरा होत असताना या रायफल महिला कसे कार्य करत आहेत याची माहिती पुढे आली आहे. या रायफल महिलांमुळे संवेदनशील भागात स्थानांवर सुरक्षा दलांचे काम सुरळीत झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे स्थानिक महिलांशी या महिला सैनिक प्रभावी पद्धतीने संवाद साधू शकत आहेत.

आजपर्यंत प्रवासी वाहने तपासणी करताना महिला प्रवासी असतील तर सैनिकांना त्यांची तपासणी करणे अवघड बनत असे पण आता या रायफल महिला आल्याने हे काम सोपे झाले आहे. अनेकदा या तपासणीत अमली पदार्थ, दारूगोळा, शस्त्रे सापडली आहेत. विशेष म्हणजे जेथे भारतीय सीमा संवेदनशील भागात आहेत, म्हजे म्यानमार, बांग्लादेश, मणिपूर, मिझोरम अश्या भागात सुद्धा या रायफल महिला चांगली कामगिरी बजावत आहेत. घुसखोर, तस्कर यांचा मुकाबला या शूर महिला सहजतेने करताना दिसत आहेत.