खुलले ट्युलिप गार्डन, असा आहे ट्युलिपचा इतिहास

श्रीनगर येथील जगातील पाचव्या क्रमांकाची ट्युलिप गार्डन २५ मार्च रोजी खुली करण्यात आली असून २००७ मध्ये तयार झालेल्या या गार्डन मध्ये पुढील एक महिना रसिक पर्यटक अद्भूत नेत्रसुखाचा अनुभव घेऊ शकणार आहेत. गत वर्षी करोना प्रकोपामुळे ही बाग पर्यटकांसाठी खुली केली गेली नव्हती. त्यामुळे यंदा मोठ्या संखेने पर्यटक येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ट्युलिप वर्षातून एकदाच फुलतात त्यामुळे पर्यटक वर्षभर फुले फुलण्याची प्रतीक्षा करत राहतात.

काश्मीरच्या बादामवारी मध्ये आणि ट्युलिप बागेत फुले फुलणे हे वसंत ऋतूच्या आगमनाचे द्योतक मानले जाते. दरवर्षी १ एप्रिल रोजी ट्युलिप बाग खुली केली जाते पण यंदा आठवडाभर अगोदरच बाग खुली केली गेली असून यंदा १५ लाख ट्युलिप पर्यटकांच्या नजरेला आनंद देण्यास सज्ज आहेत. ज्या जमिनीवर ही बाग आहे ती सिराजुद्दीन यांच्या मालकीची होती पण ते फाळणीच्या वेळी पाकिस्तान मध्ये गेल्याने ही जमीन सरकारी मालकीची झाली होती. दरवर्षी ६० ते ७० लाख रुपये खर्चून येथे ट्युलिपची रोपे हॉलंड येथून आणली जातात.

ट्युलिप हा फारसी शब्द असून त्याचा अर्थ आहे पगडी. हे फुल उलटे धरले तर पगडीसारखे दिसते. तुर्कस्तानी या फुलांनी त्यांच्या पगड्या सुशोभित करत असत. इतिहास सांगतो १५५४ मध्ये तुर्कास्तानातून ट्युलिप ऑस्ट्रिया मध्ये गेली आणि तेथून १५७१ मध्ये हॉलंडला गेली. १५७७ मध्ये ब्रिटन येथे ट्युलिप शेती सुरु झाली.

ट्युलिपची फुले काही संदेश देतात असे मानले जाते. वर्षभर प्रतीक्षा केल्यावर हे फुल फुलते आणि त्याचे आयुष्य तीन ते चार दिवसाचे असते. त्या काळात हे फुल पाहणाऱ्याला आनंद देतेच पण जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहण्याचा संदेशही देते. सफेद रंगाचे ट्युलिप क्षमाभाव आणि विनम्रतेचे प्रतिक मानले जाते. हॉलंड येथील कीएनकोक ही जगातील सर्वात मोठी ट्युलिप गार्डन आहे.