युएफओचा भयानक वेग पाहून घाबरले होते अमेरिकन पायलट

युएफओ म्हणजे उडत्या तबकड्या प्रत्यक्षात आहेत वा नाही हा वादाचा विषय आहे. अमेरिकेच्या माजी गुप्तचर प्रमुखांनी, जॉन रॅटक्लिफ यांनी फॉक्स न्यूज चॅनला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकन पायलट प्रचंड वेगाने आणि तरीही अजिबात आवाज न करता जाणाऱ्या युएफओ ना पाहून घाबरले होते असे सांगितले आहे.

जॉन म्हणाले सॉनिक बूम आवाज न करता ध्वनीच्या वेगाने जाणाऱ्या काही वस्तू आमच्या पायलटनी पाहिल्या आणि त्यांचा वेग पाहून ते घाबरले होते. कारण इतक्या प्रचंड वेगाने कोणताही आवाज न करता एखादे विमान जाणे शक्य नाही शिवाय या वस्तूंचा वेग इतका होता की क्षणात त्या रडारवरून दिसेनाश्या झाल्या होत्या. अमेरिकेत असे तंत्रज्ञान अजून विकसित झालेले नाही.

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटॅगॉन एलियनच्या विमानांच्या संदर्भातील काही महत्वाचे कागद १ जून रोजी सार्वजनिक करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जॉन बोलत होते. ते म्हणाले या पूर्वीही अशी गुप्त कागदपत्रे सार्वजनिक केली गेली आहेत. आमच्या नौसेनेने एलियन विमानांचे  अनेक व्हिडीओ घेतले आहेत. एलियनची विमाने म्हणजे युएफओ ऐवजी ही अन्य कुणी देशांनी तयार केलेली गुप्त विमाने नाहीत ना याची चिंता अमेरिकेला आहे.

नासामध्ये एक्स – ५९ सुपरसोनिक तंत्रज्ञानाने बनलेले विमान आत्ता तयार केले जात असून तेही ध्वनीच्या वेगाने आणि अजिबात आवाज न करता उडेल असा अंदाज आहे.