रश्मी शुक्ला यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप


मुंबई – एक वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बचे प्रकरण राज्यात अजूनही वाजत असताना आता दुसऱ्या एक वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावरून नवा वाद सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमधून राज्यातल्या पोलीस बदली रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचा दावा केल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत गंभीर दावे केले आहेत. पाया पडत रश्मी शुक्ला म्हणाल्या होत्या, मै माफी मांगती हूँ, मेरा लेटर वापस दे दो, असा दावा पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर टीका करताना शिवाजी महाराजांची शिकवण महाराष्ट्र सरकार विसरले, असे म्हटले आहे. आपण खूप मोठ्या ह्रदयाचे आहोत, हे दाखवण्याची चूक सरकारकडून झाली. शिवाजी महाराजांचे तत्व होते, ते चूक झाल्यावर माफी नाही, ही शिकवण राज्य सरकार विसरलं होते, असे ते म्हणाले. जर रश्मी शुक्ला सगळ्या चुका करून रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्या आणि मला माफ करा म्हणाल्या. माझे पती नुकतेच वारल्याचे म्हणाल्या, तर कोणत्याही व्यक्तीला पाझर फुटतोच. पण हा मोठ्या कटाचा भाग असल्याचे लक्षातच आले नसल्याचा दावा देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

हे कुणी आत्तापर्यंत बोलायला तयार नव्हते. आता बोलतील. चौबे नावाचे अधिकारी कायदा-सुव्यवस्था सह आयुक्त होते. ती सर्वात मोठी पोस्ट होती. स्वत:साठी पोस्टिंग ते मागतील का? थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे संबंध असतात. कुठल्यातरी नवाज, इंगोलेसोबत ते बोलतील का? माणसे यांनीच प्लांट करायची, माणसांना यांनीच संभाषण करायला लावायचे, ते यांनीच टेप करायचे आणि यांनीच त्याचा वापर बाजारात करायचा. रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट म्हणून काम करतात हे मला सांगायचे होते, म्हणून मी यड्रावकरांचे ट्विट केल्याचे आव्हाड यावेळी म्हणाले.


गुरुवारी दुपारी रश्मी शुक्ला यांच्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले होते. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकासआघाडीमध्ये न जाता भाजपबरोबर रहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. अजून काय पुरावे पाहिजेत?, असा सवाल त्यांनी ट्विटमधून उपस्थित केला होता.