फडणवीस आणि राज्यपाल भेटीवर कुणाल कामराचे खोचक ट्विट


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गेल्या काही दिवसांपासून निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि बदल्यांमधील भ्रष्टाचाराप्रकरणी मौन का, असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणामध्ये अहवाल मागवावा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली. तसेच आपण १०० वेगवेगळ्या मुद्यांसंदर्भात तक्रारी केल्याचेही भाजपने सांगितले आहे. पण भाजप मंत्र्यांनी बुधवारी घेतलेल्या याच भेटीवरुन कॉमेडीयन कुणाल कामराने फडणवीसांनावर निशाणा साधला आहे. रोज पहाटे चार वाजता उठून तयार होऊन फडणवीस राज्यपालांना फोन करतात, असा टोला कामराने लगावला आहे.


एक ट्विट कुणाल कामराने केले असून त्यामध्ये फडणवीसांचा उल्लेख केला आहे. तुम्हाला आपल्या आयुष्यात जर अनेक गोष्टींमध्ये अपयश येत असल्याचे वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की रोज पहाटे चार वाजता उठून देवेंद्र फडणवीस तयार होतात आणि राज्यपालांना फोन करुन विचारतात, मी पुन्हा येऊ का? अशा आशयाचे ट्विट कामराने केले आहे.

बुधवारी सकाळी कुणाल कामराने केलेल्या या ट्विटला २९०० हून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवनावर जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. अजित पवारांनी अवघ्या काही दिवसांनंतर राजकीय घडामोडींमुळे आपला पाठिंबा काढून घेतला आणि फडणवीसांनी राजीनामा दिला. यामुळे सर्वात कमी कालावधीसाठी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला होता. बराच राजकीय गोंधळ पहाटेच्या या शपथविधीवरुन निर्माण झाला होता. कुणाल कामराने त्याचाच संदर्भ देत फडणवीसांवर आता निशाणा साधला आहे.