सीएसकेच्या नव्या जर्सीतून भारतीय सेनेचा सन्मान

आयपीएलचा चौदावा सिझन ९ एप्रिल पासून सुरु होत असून चेन्नई सुपरकिंग्सची नवी जर्सी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने बुधवारी लाँच केली. या जर्सीत भारतीय सेनेचा सन्मान म्हणून कॅमोफ्लॅज सामील करण्यात आला आहे. जर्सी मध्ये फ्रेंचाईजी लोगोच्या वर तीन वेळा आयपीएल विजेतेपद मिळविल्याचे प्रतिक म्हणून तीन स्टार आहेत. शिवाय भारतीय सेनेच्या सन्मानार्थ  कॅमोफ्लॅज आहे. सीएसके या सिझनचा पाहिला सामना १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स बरोबर खेळणार आहे.

नव्या जर्सीविषयी बोलताना सीएसकेचे सीईओ केएस विश्वनाथ म्हणाले, भारतीय सशस्त्र सेनेच्या अहम आणि निस्वार्थी सेवेप्रती जागरुकता कशी करता येईल यावर आम्ही दीर्घकाळ विचार करत होतो. नव्या जर्सीवरील कॅमोफ्लॅज म्हणजे सेनेच्या सेवेप्रती आम्ही दाखविलेला सन्मान आहे. तेच खरे हिरो आहेत. सीएसकेच्या ट्विटर हँडलवर धोनी नव्या जर्सीचे अनावरण करत असतानाचा व्हिडीओ शेअर केला गेला आहे.

सीएसकेला भारतीय सेनेबद्दल खूप आदर आहे. त्यांनी २०१९ च्या आयपीएल सिझन मध्ये भारतीय सेनेसाठी दोन कोटींचा धनादेश दिला होता. सीएककेचा कप्तान महेंद्रसिंग धोनी प्रादेशिक सेनेमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल पदावर असून त्याने रीतसर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सीएसकेने २००८ नंतर प्रथमच जर्सीचे नवे डिझाईन तयार केले आहे.