पर्यटनाला कुठेही जा, ट्री हाउस मधील मुक्कामाची मजा अनुभवा

यंदा पर्यटनासाठी कुठे जायचे याचे बेत अनेकांनी केले असतील आणि त्यादृष्टीने हॉटेल बुकिंग पाहायला सुरवात केली असेल. भारतात कुठेही पर्यटनाला जायला हरकत नाही पण या वेळी अनेक पर्यटन स्थळी उपलब्ध असलेल्या ट्री हाउस मध्ये मुक्कामाचा अनुभव जरूर घ्या. हिमाचल पासून दक्षिणेकडील बहुतेक सर्व निसर्ग पर्यटन स्थळांवर अशी ट्री हाउस उपलब्ध आहेत.

ट्री हाउस म्हणजे झाडावर बांधलेली घरे. ती अर्थातच जमिनीपासून उंचावर असतात. त्यात मुक्कामाचा अनुभव काही वेगळाच. पक्षी झाडावर घरे बांधून राहतात. माणूस इच्छा असली तरी अशी घरे बांधू शकत नाही. पण झाडावर निवासाची हौस अशी ट्री हाउस नक्कीच पूर्ण करतात. निसर्गात, गजबजाटापासून दूर, शांतपणे राहण्याचा, पहाटे पहाटे पक्षी कूजन ऐकण्याचा, निरव शांततेचा अनुभव येथे घेता येतो.

हिमाचल प्रदेशात सिमला, कुलू, मनाली, जीभी, कसोल येथे अशी ट्री हाऊसेस आपण बुक करू शकतो. मध्यप्रदेशात वाघ बघायला बांधवगडला जाणार असाल तर तेथेही ही सुविधा आहे. पुद्दुचेरीला बॅक वॉटर्सचा सुंदर नजारा दाखविणारी ट्री हाउसेस आहेत तर केरळ मध्ये वायनाड मध्येही ही सुविधा आहे. मुन्नार ला गेलात तर तेथेही ट्री हाउस मध्ये राहण्याचा आनंद मिळवू शकता आणि पश्चिम घाटातील हिरव्यागार दाट जंगलात म्हणजे मुदुमलाई येथेही असा स्टे तुम्ही करू शकता.

ट्री हाउस जमिनीपासून उंचावर, झाडांवर असली तरी तेथे सर्व सुविधा असतात. काही ठिकाणी वाचनालय, मिनी बार, एसी अश्याही सुविधा आहेत. स्थानिक पदार्थांचा स्वाद येथे चाखता येतो. मित्र परिवार, कुटुंबांसह जात असला तर अश्या वेगळ्या जागी राहण्याची मजा आणखी वाढते.