तीन शब्दांचा डायलॉग, त्यासाठी २७ वेळा प्रवास, सांबाची कथा

चित्रपट निर्मिती कथा नेहमीच रम्य असतात. कोणत्याही चित्रपट शुटींग दरम्यान हजारो अश्या संस्मरणीय घटना घडत असतात.  ‘ पुरे पचास हजार’ हा डायलॉग ऐकला की नक्कीच कुणाही चित्रपट वेड्याच्या डोळ्यासमोर ‘शोले’ या अतिगाजलेल्या चित्रपटातील सांबा येत असणार. याच सांबा म्हणजे मॅकमोहन याचा हा किस्सा कदाचित तुम्ही ऐकला नसेल.

मॅकमोहनने ‘पुरे पचास हजार’ एवढा तीन अक्षरी डायलॉग शूट करायला मुंबई ते बंगलोर असा तब्बल २७ वेळा प्रवास केला होता. मॅकमोहनने अनेक गाजलेल्या चित्रपटात भूमिका केल्या पण त्याला खरी आणि कायमची प्रसिद्धी दिली त्याच्या शोले मधील सांबानेच. असे सांगतात की शोलेतील मॅकमोहनची सांबा भूमिका सुरवातीला थोडी मोठी होती. पण एडिटिंग करताना फक्त वरील तीन शब्द राहिले. चित्रपट पाहिल्यावर इतका छोटा डायलॉग पाहून त्याला रडायला आले आणि त्याने निर्माते सिप्पी यांना इतकी छोटी भूमिका का दिली, त्यापेक्षा काढून टाकायचे होते असा जाब विचारला. तेव्हा सिप्पींनी त्याला सांगितले तुझा हा डायलॉग हिट होणार आणि सांबा म्हणूनच तुझी नवी ओळख तयार होणार. त्यांचे शब्द खरे झाले.

मॅकमोहनचे वडील भारतात ब्रिटीश आर्मी मध्ये कर्नल होते. १९४० मध्ये हे कुटुंब कराचीतून लखनौला आले. तेथे सांबाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो मुंबईत आला. त्याला क्रिकेट मध्ये करिअर करायचे होते आणि उत्तर प्रदेश क्रिकेट टीम कडून तो खेळला होता. मात्र मुंबईत रंगमंच पाहिला आणि त्याला आपण अभिनेता व्हावे असे वाटले. शबाना आझमीच्या आईने त्याला पहिली संधी दिली नाटकात. १९६४ मध्ये त्याने प्रथम हकीकत चित्रपटात काम केले. त्यानंतर डॉन, सत्ते पे सत्ता, कर्ज, जंजीर, रफूचक्कर, शान, खून पसीना असे अनेक गाजलेले चित्रपट केले ते खलनायक म्हणूनच. त्याने सुमारे २०० चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.