ज्वालामुखीच्या लाव्हावर हॉटडॉग भाजून वैज्ञानिकांनी भागविली भूक

आइसलँडमध्ये ८०० वर्षापूर्वीचा ज्वालामुखी फाटून रसरशीत लाव्हाचे लोट जमिनीवर येत असल्याचे भीषण दृश्य दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असतानाच या संदर्भातला आणखी एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर धमाल माजवीत आहे. धगधगत्या लाव्हाची तपासणी करायला गेलेल्या वैज्ञानिकांनी त्यांची भूक या लाव्हावर हॉटडॉग भाजून कशी भागविली हे या व्हिडीओ मध्ये दिसते आहे.

आईसलंडची राजधानी रेकेविक पासून काही अंतरावर असलेल्या किलर पर्वतावर हा ज्वालामुखी उद्रेक होत आहे. येथून अजूनही लाव्हा बाहेर पडत आहे. त्याची पाहणी करण्यासाठी वैज्ञानिक गेले होते तेव्हा त्यांना भूक लागली. पण जवळपास शहर किंवा गाव नव्हते. तेव्हा त्यांनी बॅगेत असलेले बन व चिकन सॉसेज गरम लाव्हावर ग्रील करून हॉटडॉग बनविले आणि भूक भागविली.

लाव्हाचे तापमान साधारण ७०० ते १२०० डिग्री पर्यंत असते. त्यात धातू, खडक सुद्धा वितळू शकतात. आईसलंड मध्ये फुटलेल्या ज्वालामुखीचे थेट प्रसारण राष्ट्रीय टीव्ही वरून केले जात आहे. लाव्हावर भाजलेल्या हॉटडॉगला लाव्हाच्या राखेचा वास लागला होता त्यामुळे ते खुपच बेचव होते असा अनुभव या वैज्ञानिकांनी सांगितला.