सुवेझ कालव्यात ट्रॅफिक जाम

रस्त्यात वाहतूक कोंडी हे बहुतेक बड्या शहरातून दिसणारे नित्याचे दृश्य आहे मात्र भल्या थोरल्या समुद्रात प्रवास करताना सुद्धा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असेल याची कल्पना आपल्याला येत नाही. इजिप्तच्या सुवेझ कालव्यात सध्या अशी वाहतूक कोंडी झाली असून मालवाहू जहाजांची भली मोठी रांग लागल्याचे दृश्य दिसत आहे. ही परिस्थिती एका विशाल कंटेनर शिप मुळे ओढवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एवर गिव्हन नावाचे एक विशाल कंटेनर शिप हा कालवा पार करत असताना आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे जहाजावरचे नियंत्रण सुटून कालव्यात आडवे झाले. त्यामुळे कालवा ब्लॉक झाला. या जहाजाची लांबी ४०० मीटर आणि रुंदी ५९ मीटर आहे. हे जहाज कालव्यात आडवे झाल्याने ते तेथे अडकले आहे. जहाजाला धक्का देणाऱ्या अनेक टग बोटींचा वापर करून जहाज सरळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे मात्र त्याला यश आलेले नाही.

यामुळे कालव्याच्या दोन्ही बाजूना असलेली मालवाहतूक करणारी जहाजे अडकून पडली आहेत. १९३.३ किमी लांबीचा हा सुवेझ कालवा भूमध्य सागर आणि रेड सी याना जोडतो. या मार्गाने रोज हजारो लहान मोठी जहाजे युरोप ते आशिया आणि आशिया ते युरोप असा प्रवास करतात. आता हा कालवा ठप्प झाल्याने पूर्ण आफ्रिकेची चक्कर लावून जहाजांना युरोप मध्ये जावे लागेल असे दिसते आहे.

कालव्यात अडकलेले कंटेनर शिप पनामाचे असून ते २०१८ मध्ये तयार केले गेले आहे. एव्हरग्रीन नावाची तैवानी वाहतूक कंपनी या जहाजाचे संचालन करते. हे जहाज चीन मधून माल घेऊन नेदरलंड कडे चालले होते.