ठाणे सत्र न्यायालयाचा महाराष्ट्र ATS ला मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्याचा आदेश!


ठाणे – राज्यात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून एनआयए विरुद्ध एटीएस असा अघोषित सामना सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले होते. एनआयएने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या प्रकरणाचा तपास हाती घेण्याचे निर्देश आणले असून देखील या प्रकरणाचा तपास एटीएसने एनआयएकडे सोपवला नव्हता.

त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशांनंतर देखील या प्रकरणात एटीएसने दोन आरोपींना अटक केली असून या प्रकरणावर मंगळवारी पत्रकार परिषद देखील घेतली होती. अखेर एटीएसला या प्रकरणाचा तपास थांबवण्याचे आदेश ठाण्यातील सत्र न्यायालयानेच दिले आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास थांबवा आणि हे प्रकरण एनआयएकडे हस्तांतरीत करा, असे निर्देश आपल्या आदेशात न्यायालयाने दिले आहेत.

महाराष्ट्र एटीएस केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश देऊन देखील मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हस्तांतरीत करत नसल्याची तक्रार एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात केली होती. सत्र न्यायालयाने एनआयएची ही तक्रार मान्य करत एटीएसला हे आदेश दिले आहेत.