पश्चिम बंगालमध्ये भुमीपूत्रालाच करणार मुख्यमंत्री; नरेंद्र मोदी


पश्चिम बंगाल – सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील पश्चिम बंगालमध्ये असून त्यांनी यावेळी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. ‘वंदे मातरम’च्या माध्यमातून येथील भूमीने देशाला एकत्र आणले, पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांना बाहेरचे असे संबोधित करत असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. दरम्यान मोदींनी यावेळी भाजप सत्तेत आल्यास येथील भुमीपूत्रालाच मुख्यमंत्री करणार, असे आश्वासन दिले आहे.

रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, बंकीमचंद्र चॅटर्जी अशा महान लोकांची बंगाल ही भूमी होती आणि येथे कोणताही भारतीय बाहेरचा नव्हता. ‘वंदे मातरम’च्या माध्यमातून बंगालने देशातील जनतेला एकत्र आणले. पण ममतादीदी बाहेरील लोक असा उल्लेख करत आहेत. येथे कोणताही भारतीय बाहरेचा नव्हता, सर्व भारतमातेची मुले असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

आम्हाला पर्यटक म्हणून म्हटले जाते, आमची खिल्ली उडवली जाते, त्याचबरोबर अपमान देखील केला जात आहे. दीदी रवींद्रनाथ टागोरांच्या बंगालमधील लोक कोणालाही बाहेरचा समजत नसल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यावेळी मोदींनी जेव्हा बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल, तेव्हा येथील स्थानिक व्यक्तीच मुख्यमंत्री असेल, असे आश्वासन दिले.

नरेंद्र मोदींचे हे वक्तव्य ममता बॅनर्जींसोबत आतले आणि बाहेरचे असा वादा सुरु असतानाच आले आहे. ममता बॅनर्जी सतत बंगालमध्ये दिल्ली किंवा गुजरातमधून आलेल्या बाहेरच्या लोकांना राज्य करु देणार नसल्याचे सांगत आहेत. नरेंद्र मोदींनी त्यालाच उत्तर दिले आहे.