अमृता फडणवीस यांच्या टीकेला भाई जगताप यांनी दिले उत्तर


मुंबई – परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यात एकीकडे मोठा राजकीय वाद सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगला असताना दुसरीकडे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यामधला वाद वेगळ्याच ट्रॅकवर रंगू लागला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती त्यांच्या पत्नी काम करतात त्याच बँकेत कशी वर्ग झाली? असा सवाल भाई जगताप यांनी केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी तिखट शब्दांमध्ये ट्विट करत भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख करत प्रत्युत्तर दिले होते. त्यावर भाई जगताप यांनी आता खोचक शब्दांमध्ये पलटवार केला आहे. सत्य जरा जास्त टोचते, असे भाई जगताप म्हणाले आहेत.

भाई जगताप यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना अमृता फडणवीसांचा उल्लेख केला होता. माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली, याचे उत्तर द्यावे, असे भाई जगताप म्हणाले होते. त्यावरून अमृता फडणवीस यांचा चांगलाच तिळपापड झाल्याचे त्यांनी केलेल्या ट्विटवरून दिसून आले.


भाई जगताप यांच्यावर अमृता फडणवीस यांनी ट्विटमधून एकेरी भाषेत टीका केली. “ए भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही UTI/Axis बँक”ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवचायचं न्हाय!” असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते. त्यावर भाई जगताप यांनी देखील आता खोचक प्रतिक्रिया दिली आहे.


मला त्या ट्वीटला अजिबात महत्त्व द्यायचं नाही. २००५ साली हा निर्णय आमचं सरकार असताना झाला, १६ बँकांचा त्यात प्रस्ताव होता. २००५ पासून २०१७पर्यंत त्यावर निर्णयच झाला नाही. पण २०१७मध्ये अचानक अशी काय जादू झाली की अ‍ॅक्सिस बँकेकडे खाती वर्ग करण्यात आली? ही गोष्ट खरी आहे की सत्य जरा जास्त टोचतं आणि हे सत्य असल्याचे भाई जगताप म्हणाले आहेत. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्यावर एकेरी उल्लेखावरून टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी मंगळवारी केलेल्या ट्विटमध्ये भाई जगताप यांचा पुन्हा आदरार्थी उल्लेख केल्याचे आढळून आले आहे.