निसर्गाच्या मांडीवर पहुडलेले चांगलांग

सुट्या सुरु झाल्या की भटक्या लोकांना पर्यटनाचे वेध लागतात. भारतात उन्हाळा सुरु झाला की सुट्ट्या लागतात आणि बहुतेकांची इच्छा थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची असते. या दृष्टीने नवनव्या हिल स्टेशनचा शोध सुरु असतो. निसर्गाच्या सानिध्यात शरीर आणि मन शांत करायचे असेल, त्यांना पूर्ण विश्रांती देऊन ताजे तवाने करायचे असेल तर अरुणाचल प्रदेशातील चांगलांगला भेट द्यायला हवी.

चांगलांग हे निसर्गाच्या मांडीवर पहुडलेले नितांतसुंदर ठिकाण आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात. खुली मैदाने, उंच उंच पर्वत रांगा, हिरवळ, नदी ओढे आणि थंडगार हवा असलेले हे ठिकाण तुम्हाला कधीही गेलात तरी प्रसन्नतेचा अनुभव देते. या ठिकाणी भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.

लेक ऑफ नो रिटर्न या विचित्र नावाचे सरोवर त्यातील एक. असे सांगतात की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी या सरोवरात अनेक जहाजे बुडाली त्यामुळे त्याला लेक ऑफ नो रिटर्न असे नाव पडले आहे. नोआ देहिंग नदी किनारी असलेले मियाओ हे असेच सुंदर ठिकाण. हे तिबेटी लोकांचे आश्रयस्थान आहे. नोओ देहिंग नदी सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारी आहे.

नामदफा नॅशनल पार्क येथे वन्य जीवांचे दर्शन घेण्यास विसरू नका. १९८३ साली भारत सरकारने हे पार्क टायगर रिझर्व म्हणून घोषित केले आहे. उंच पर्वतानी वेढलेल्या या अभयारण्यात वाघ आहेतच पण हिमालयन अस्वले, तरस, हत्ती असे अन्य वन्य जीव सुद्धा पाहायला मिळतात.

या प्रदेशाला अनोख्या संस्कृतीचे वरदान लाभले आहे. येथे अनेक जाती जमातीचे लोक राहतात. त्यातील तंग्सा आणि तुटसारू या प्रमुख जमाती आहेत. वर्षभर त्यांचे उत्सव आणि सण साजरे होतात आणि त्यानिमित्ताने त्यांची नृत्ये, आभूषणे, खानपान यांची जवळून ओळख करून घेता येते.