सिलिकॉन व्हॅलीतील कंपनीत कामाला लागला प्रिन्स हॅरी

ब्रिटीश राजघराण्याचा राजकुमार पण आता राजघराण्याचा त्याग करून बाहेर पडलेल्या प्रिन्स हॅरीने अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली मधील एका कंपनीत नोकरी घेतली आहे. प्रिन्स हॅरी याला  कोचिंग स्टार्ट अप ‘बेटरअप’ या कंपनीत चीफ इम्पॅक्ट ऑफिसर पदावर नेमणूक दिली गेली आहे. ही कंपनी सॅन फ्रान्सिस्कोची हेल्थ टेक कंपनी आहे. ही कंपनी मानसिक स्वास्थ क्षेत्रात व्यावसायिक पातळीवर कोचिंग देते. २०१३ मध्ये या कंपनीची सुरवात झाली आहे.

प्रिन्स हॅरीने त्याच्या ब्लॉगवर बेटरअप टीमशी जोडले गेल्याचा आनंद व्यक्त करून संधी दिल्याबद्दल कंपनीला धन्यवाद दिले आहेत. त्याच्या मते मानसिक स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित केल्यास नवीन संधी तसेच माणूस त्याच्या आतली ताकद यांचा अनुभव घेऊ शकतो.

प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मर्केल यांनी ब्रिटन राजघराण्याच्या सर्व उपाध्यांचा त्याग करून सर्वसामान्य नागरीकाप्रमाणे जगण्याचा निर्णय घेतला आहे. राजघराणे त्यागल्यावर त्यांच्या आयुष्यात खुपच बदल झाला असून राघराण्यातील म्हणून मिळणाऱ्या सर्व सुविधा बंद झाल्या आहेत.