मुंबई गुन्हा अन्वेषण विभागातील ६५ मुदतपूर्व बदल्या


फोटो साभार टाईम्स ऑफ इंडिया

महाराष्ट्रात बदली रॅकेट संदर्भात आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरु असतानाच मंगळवारी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच गुन्हा अन्वेषण विभागाची एका रात्रीत सफाई करण्यात आली. नवे पोलीस आयुक्त नागराळे यांनी एका दिवसात ८० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात गुन्हा अन्वेषण विभागाच्या ६५ जणांचा समावेश आहे. यात बहुतेक सर्व गुन्हा अन्वेषण शाखामधील वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार डॉन रवी पुजारीला अटक करणारे अजय सावंत, डॉन एजाज लकडावाला याला अटक करणारे सचिन कदम, आयपीएल स्पॉट फिक्सिंग केस सोडविणारे नंदकुमार गोपाळे यांचाही या बदल्यात समावेश आहे. या सर्वाना स्थानिक पोलीस स्टेशन किंवा साईड पोस्टिंगवर टाकले गेले आहे.

असिस्टंट इन्स्पेक्टर सचिन वाझे यांच्यामुळे गुन्हा अन्वेषण विभागाची फारच बदनामी झाली आहे. वाझे ज्या क्राईम इंटेलिजंट युनिटचे प्रमुख होते तेथील बहुतेक सर्व अधिकारी बदलले गेले आहेत. पण ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना मुंबई पोलिसातील चांगले तपास अधिकारी म्हणून ओळखले जाते. यामुळे या बदल्यांनी पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.