मुंबईत धुलिवंदन आणि होळीचा उत्सव साजरा करण्यास महापालिकेकडून निर्बंध


मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित वाढू लागले असल्यामुळे सातत्याने ३ हजारांच्या वर ही रुग्णवाढ असल्यामुळे प्रशासनासाठी ती चिंतेची बाब ठरली आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जारी केलेली असताना आता मुंबई महानगरपालिकेने देखील काही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी येत्या रविवारी असणारा होळीचा उत्सव, तसेच त्यानंतर असणारा धुलिवंदन हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक अशा कोणत्याच ठिकाणी साजरा करण्यास मुंबई महानगर पालिकेकडून मनाई करण्यात आली आहे.

महानगर पालिकेकडून त्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. हा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी घेण्यात आल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच, नियम मोडणाऱ्यांवर साथरोग कायदा १८९७, आपत्ती निवारण कायदा २००५ आणि भादंवि १८६० नुसार कारवाई केली जाईल, असे देखील या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मुंबईतील ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी दिवसभरात तब्बल ३ हजार ५१२ नवे कोरोनाबाधित सापडले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १२०३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून रिकव्हरी रेट आता ९० टक्क्यापर्यंत आला आहे. त्यामुळे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारने याआधीत थिएटर्स, नाट्यगृहे, कार्यालये या ठिकाणी ५० टक्के क्षमतेनेच प्रेक्षक किंवा कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात नियमावली जारी केली आहे. मुंबईत होळी किंवा धुलिवंदन या उत्सवांदरम्यान जागोजागी गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळेच पालिका प्रशासनाने सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही ठिकाणी हे उत्सव साजरे करण्यास मनाई केली आहे.