शिवसेनेला माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा ‘जय महाराष्ट्र’


नवी मुंबई : आज अखेर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय माजी आमदार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी घेतला आहे. लोकसभेची निवडणूक नरेंद्र पाटील यांनी सातारा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर लढवली होती. आज माथाडी कामगारांच्या कार्यक्रमात नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्ष होत आले, तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविलेले नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले. बैठकीबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे वेळ मागूनही ते भेटत नसल्यामुळे आपण शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी जाहीर केले.

आपले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असून ते शिवसेना नेत्यांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेनेत मी राहू नये अशीच पक्षातील नेत्यांची इच्छा असल्याने आपण नाईलाजास्तव शिवसेना सोडत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.

शिवसेनेला नुकताच रामराम ठोकत असल्याचे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे. असे असले तरी दोन दिवसापूर्वी सध्या सोशल मीडियात उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्या गळाभेटीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना पहायला मिळत आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर उदयनराजे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची समोरासमोर भेट झाली. या भेटीवेळी नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना पहात ‘साहेब मुख्यमंत्री होणार आहेत’ असे आनंदात सांगत उदयनराजेंना कडकडून मिठी मारली. नरेंद्र पाटील यांचा निरोप ऐकूण उदयनराजेंनी देखील नरेंद्र पाटील यांना पुन्हा मिठीत घेतलं. दोन दिवसापुर्वीचा हा व्हायरल व्हिडिओ म्हणजे म्हणजे नरेंद्र पाटील यांचे शिवसेना सोडण्याच्या अगोदरच सगळे ठरल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.