मराठी सिनेसृष्टीमधील ख्यातनाम केदार शिंदे यांनी त्यांच्या आगामी ‘बाईपण भारी देवा’ची या चित्रपटाची घोषणा केली आहे. केदार शिंदेंनी आज (23 मार्च) सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या या आगामी चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर शेअर केले आहे. दरम्यान या पोस्टरवर कलाकारांचा फोटो किंवा नाव टाळलेले असून केवळ लाल सनग्लासेस, चंद्रकोर टिकली मधून ‘बाईपण’ दाखवण्यात आले आहे. तर या चित्रपटाच्या पोस्टरवर ‘नो टेंशन फुल्ल टशन’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.
केदार शिंदेंनी रिलीज केले आपल्या आगामी चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर
केदार शिंदेचा आगामी ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट शीर्षकावरून धम्माल कॉमेडीच्या माध्यमातून रसिकांना खिळवणारा असेल याचा अंदाज येत आहे. दरम्यान हा चित्रपट 28 मे 2021 ला रिलीज होणार आहे. स्क्रीनशॉट्स ही निर्मिती संस्था याच चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
टेलिव्हिजन, नाटक आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात केदार शिंदे हे यशस्वी ठरले आहेत. केदार शिंदेंची ‘कलर्स मराठी’वर सध्या ‘सुखी माणसाचा सदरा’ ही मालिका सुरू आहे. त्यामध्ये भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहे. लॉकडाऊननंतर मनोरंजन क्षेत्र पुन्हा रूळावर येत होते, तेव्हा केदार यांनी या निखळ कॉमेडी मालिकेतून रसिकांचे पुन्हा मनोरंजन करण्यास सुरूवात केली आहे.