टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती शक्य – उद्धव ठाकरे


मुंबई : टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती करणे शक्य आहे. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण आणि आर्थिक समृद्धीच्या वाटेवर मार्गस्थ झालेल्या गावांचे, गावकऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. तसेच शासन या सर्व कामात त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

22 मार्चच्या जागतिक जलदिनाचे औचित्य साधून पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमात कृषिमंत्री दादाजी भुसे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, मुख्य सचिव सीताराम कुंटे याशिवाय पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान, श्रीमती किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, समृद्ध गाव योजनेतील गौरवाला पात्र ठरलेल्या गावातील नागरिक, राज्याच्या १८ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.

जलक्रांतीतून हरितक्रांती येणार आहे आणि हरितक्रांतीतून सुबत्ता. पण हे कुणा एकाचे काम नाही तर ते सर्वांनी एकत्र येऊन करावयाचे काम आहे असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची शास्त्रशुद्ध साठवणूक, पाणी वापर, पाणी नियोजन, पिक पद्धती, पौष्टिक गवताची निर्मिती अशा सर्व महत्त्वाच्या विषयांचा संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम पाणी फाउंडेशनने केले. यातली प्रयोगशीलता समजून सांगितली. पाण्याचा जमिनीखालचा सातबारा कसा मोजायचा हे समजावून सांगितले. शिक्षणाबरोबर संस्कार महत्त्वाचा असतो. पाणी नियोजनाचा हा संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करणार असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. वसंत कानेटकरांनी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा गवताला भाले फुटण्याची गरज आहे. यातूनच अडचणींवर मात करत समृद्ध आणि पाणीदार गावांच्या निर्मितीसाठीची जिद्द आपल्याला मिळेल.

पावसाचे वाहून जाणारे पाणी धरणे, कालवे या माध्यमातून साठवताना त्याचा नियोजनबद्ध वापर होणे गरजेचे असते. यासाठी माथ्यापासून पायथ्यापर्यंतच नाही तर मुळापर्यंत जाऊन काम करण्याची तयारी ठेवावी लागते. तीच तयारी पाणी फाउंडेशनने केली, गावकऱ्यांना सोबत घेऊन, सोप्या साध्या भाषेत त्यांच्यापर्यंत यासंबंधीचे ज्ञान पोहोचवून त्यांनी काम केल्याचे प्रशंसोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.