सौदी पुरुषांना विदेशी महिलांबरोबर विवाहास बंदी

सौदी अरेबियाने देशातील सौदी पुरुषांना बांग्लादेशी, पाकिस्तानी, म्यानमार मधील महिलांबरोबर विवाह करण्यास अनधिकृत बंदी केली आहे. या संदर्भातला कोणताही कायदा बनविला गेलेला नाही मात्र असे विवाह करण्यासाठी अनेक अटी व नियम लागू केले असल्याचे डॉन वृत्तपत्राने सौदी मिडियाचा हवाला देऊन म्हटले आहे.

रिपोर्टच्या आकडेवारीनुसार सौदीत लग्न करून आलेल्या परदेशी महिलांची संख्या पाच लाखांवर आहे. सौदी पुरुषांनी वरील देशातील महिलांबरोबर विवाह करू नये यासाठी कडक नियम केले गेले आहेत. त्यातूनही एखाद्याला असा विवाह करायचा असेल तर त्यासाठी अनेक अटी घातल्या गेल्या आहेत.

असा विवाह करू इच्छिणाऱ्या पुरुषाला सरकारी परवानगी काढावी लागेल. अधिकृत माध्यमातूनच विवाहांसाठी अर्ज करावा लागेल. तलाक घेतलेल्या पुरुषांना सहा महिन्याच्या आत अर्ज करता येणार नाही. अर्जदाराचे वय २५ पूर्ण असले पाहिजे. विवाह करणाऱ्या पुरुषाने स्थानिक जिल्हा महापौर यांच्या सहीसह कागदपत्रे सादर करायची आहेत. शिवाय अन्य ओळखपत्रेही द्यायची आहेत. अगोदर विवाहित असणाऱ्यांनी पहिली पत्नी विकलांग, वांझ, जुन्या आजाराने पिडीत असल्यास तसे रिपोर्ट हॉस्पिटल मधून आणून सादर करायचे आहेत.