एलजी मोबाईल कंपनी बंद होणार

इलेक्ट्रोनिक क्षेत्रातील जगप्रसिद्ध कोरियन कंपनी एलजी ने त्यांच्या मोबाईल कंपनीचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा एप्रिल मध्ये केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जगभरात इंटरनेट आणि स्मार्टफोनची मागणी वाढत असतानाच एलजीच्या मोबाईल कंपनी बंद करण्याच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या कंपनीने आत्त्तापर्यंत एकसो एक शानदार स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. टेकसाईट टेलिकॉमटॉकच्या माहितीनुसार एलजीने रोलेबल डिस्प्लेवाल्या स्मार्टफोन डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एलजी त्यांच्या अन्य इलेक्ट्रोनिक उत्पादनातून चांगली कमाई करत आहे मात्र स्मार्टफोन उत्पादनातून कंपनीला तोटा होतो आहे. अगोदर मोबाईल उत्पादन व्यवसाय अन्य कंपनीला विकण्याचा विचार केला गेला होता. त्या दृष्टीने व्हिएतनामी विनग्रुप जेएससी आणि जर्मन वोग्सवॅगन बरोबर प्राथमिक बोलणी झाली होती. मात्र अपेक्षित किंमत मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर कंपनीने मोबाईल उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

वास्तविक गेले काही दिवस कंपनी नवीन स्मार्टफोन वर संशोधन करत होती आणि २०२१ मध्ये नवे स्मार्टफोन बाजारात आणण्याची तयारी कंपनीने केली होती असेही समजते.