पूर्णपणे संरक्षण देणारा पॉलीमर मास्क तयार
चंदिगढच्या सेंट्रल सायंटीफिक इन्स्ट्रुमेंट ऑर्गनायझेशन मधील वैज्ञानिकांनी करोना पासून संरक्षण देणारा आणि वापरण्यास अतिशय सुलभ असा पॉलीमरचा मास्क तयार केला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी हा मास्क वापरून त्याचे कौतुक केले आहे. हर्षवर्धन चंदिगड दौऱ्यावर सेक्टर ३० मध्ये प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यासाठी गेले असताना डॉ. सुनिता मेहरा यांनी हा मास्क डॉ. हर्षवर्धन याना भेट दिला. करोना उद्रेकात संरक्षणासाठी मास्क आवश्यक आहे मात्र सतत मास्क वापरण्याचे काही त्रास आहेत. चालताना मास्क मुळे श्वास घेण्यास अडचण होणे, चष्मा असेल तर काचांवर वाफ जमा होणे अश्या ज्या अडचणी येतात त्या या मास्क मुळे येणार नाहीत.
हा मास्क सहज धुता येतो आणि मास्क लावल्यावर करोनाचे विषाणू आत प्रवेश करू शकत नाहीत. हा मास्क पारदर्शी असल्याने मास्क लावलेल्या व्यक्तीचा पूर्ण चेहरा दिसतो. विमानतळावर व्यक्तीचा पूर्ण चेहरा दिसणे गरजचे असते अथवा सीसीटीव्ही मध्ये फोटो येण्यासाठी चेहरा दिसणे आवश्यक असते त्या दोन्ही गरजा या मास्क मुळे पूर्ण होणार आहेत.
हा मास्क चारी बाजूनी बंद आहे पण तरीही त्यामुळे श्वास कोंडत नाही. श्वास सोडताना वाफ धरत नाही. या मास्कचे पेटंट फाईल केले गेले असून सध्या त्याची कॉस्ट १५० ते २०० रुपये आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु झाल्यावर ही किंमत कमी होणार आहे. याच बरोबर डोळ्यांना पूर्ण संरक्षण देणारा चष्मा सुद्धा बनविला गेला असून त्याची किंमत साधारण २५० रुपये असल्याचे समजते.