आइसलँडमध्ये ८०० वर्षानंतर फुटला ज्वालामुखी, व्हिडीओ व्हायरल
ज्वालामुखी उद्रेक ही एक नैसर्गिक घटना असली तरी ही घटना अत्यंत भयावह असते. आइसलँडमध्ये नुकताच ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत साडेतीन लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिला असून त्याला चौतीस हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. ८०० वर्षानंतर या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असल्याचे समजते. ड्रोनच्या सहाय्याने या उद्रेकाचे चित्रण केले गेले असून त्यात ज्वालामुखीचे मुख आणि जमिनीला पडलेल्या प्रचंड भेगातून रसरशीत तप्त लाव्हारस वेगाने वाहताना दिसत आहे. ज्वालामुखी उद्रेकाचे परिणाम अतिशय विनाशकारी असतात.
आईसलंड मधील हा ज्वालामुखी राजधानी रेक्यानिसच्या दक्षिण पश्चिमेला रेक्येनी पेनिन्सुला येथे आहे. या ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हा ५०० ते ७०० मीटर परिसरात वाहत असून रात्रीच्या वेळी हा व्हिडीओ घेतला गेला आहे. त्यामुळे अंधारात फक्त उसळता लाव्हा दिसतो आहे. आईसलंड मेटेरॉलोजिकल ऑफिसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. १९ मार्चला रात्री पावणे नऊ पासून या ज्वालामुखीचा उद्रेक सुरु झाला आहे. या काळात आइसलँडला भूकंपाचे अनेक लहान मोठे धक्के बसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चार आठवड्यात देशात ४० हजार भूकंप धक्के नोंदविले गेले आहेत.