अन्यथा टेस्ला बंद करणार- एलोन मस्क
चीन किंवा कुठ्ल्याही देशात आमच्या टेस्ला कार्सचा वापर हेरगिरीसाठी केला जाणार असेल तर टेस्ला कंपनी बंद करेन असे वक्तव्य टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी केले आहे. गेल्या आठवड्यात वॉल स्ट्रीटच्या एका रिपोर्ट मध्ये चीन मध्ये सेना, राज्यातील महत्वाच्या व्यक्ती आणि सरकारी अधिकाऱ्यांनी टेस्ला कार्सचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे म्हटले होते. या कार्स मधील कॅमेरे, रेकॉर्ड मोड आणि अन्य सेन्सर्स तंत्रज्ञानाचा वापर गुप्त आणि संवेदनशील माहिती एकत्र करून अमेरिकेला पाठविली जाण्याची भीती चीन सरकारला वाटत आहे आणि त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन असे आदेश दिले गेल्याचे सांगितले जात आहे.
या संदर्भात चायना डेव्हलपमेंट फोरमबरोबर व्हर्च्युअली बोलताना मस्क म्हणाले हेरगिरी सारख्या कामात टेस्ला कधीच सामील होणार नाही. देश कोणताही असला तरी त्यांची संवेदनशील माहिती गुप्त राहिली पाहिजे याला आमचे नेहमीच प्रोत्साहन आहे. त्यामुळे चीनच काय पण अन्य कोणत्याही देशात टेस्ला कार्सचा वापर हेरगिरी करण्यासाठी, संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी केला जात असेल तर टेस्ला कंपनी बंद करावी लागेल.