लवकरच राज्याला केंद्राकडून मिळणार ‘कोव्हिशिल्ड’चे ३३ लाख डोस


मुंबई : कोव्हिशिल्ड लसींचा सुमारे ३३ लाख डोसचा साठा राज्यात येत्या काही दिवसांत केंद्राकडून देण्यात येणार असल्यामुळे राज्यात आता आरोग्य विभागाला दर दिवशी तीन लाख लोकांचे लसीकरण करणे शक्य होणार आहे.

केंद्राकडे दर आठवडय़ाला २० लाख डोस पुरविण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. आरोग्य विभागाने राज्यात प्राधान्यक्रम गटातील १.७७ कोटी लोकांचे लसीकरण करण्यासाठी दरदिवशी तीन लाख जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी एकूण २.२० कोटी डोसची आवश्यकता असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्यानुसार केंद्राकडून येत्या काही दिवसांत कोव्हिशिल्डचे ३३ लाख डोस राज्यात पुरविले जाणार आहेत.

केंद्राकडून येत्या आठवडय़ात कोव्हिशिल्डच्या ९ लाख डोसचा साठा मिळणार असून एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात आणखी २३ लाख डोसचा साठा उपलब्ध होणार आहे. तेव्हा एकत्रितरीत्या सुमारे ३३ लाख डोसचा साठा प्राप्त होणार असून त्यानुसार दरदिवशी तीन लाख लाभार्थ्यांचे लसीकरण करणे शक्य होणार असल्यामुळे पुढील दहा दिवसांचे डोस उपलब्ध असून तुटवडा नसल्याचे राज्य लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.

अद्यापही लसींचे डोस वाया जाण्याचे प्रमाण कमीच असून ते प्रमाण सध्या ५.२ टक्के आहे. सर्वसाधारणपणे दहा टक्क्यांपर्यंत डोस जातात असे मानले जाते. लसींचे डोस कमीत कमी वाया जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.