मुंबई : राज्याचे राजकीय वातावरण परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे चांगलेच ढवळून निघाले आहे. यातच आता भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून, महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा विचार करत येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून आपण ही मागणी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रामदास आठवलेंची गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
विरोधी पक्ष सचिन वाझे प्रकरणावरून आणि त्यानंतर परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बवरून सरकारवर दबाव टाकत आहे. पण अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, परमबीर सिंग यांचे पत्र तथ्यहीन असून फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. यानंतर १५ फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते. यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात मोठी तफावत आहे. फेब्रुवारी महिन्यात अनिल देशमुख कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती. हे सिद्ध झाले आहे. पण पवारांचा हा दावा खोडून काढत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ शेअर करत १५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतल्याचे म्हटले आहे.