सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार अभिनेत्री अभिनेत्री कंगना राणावतला घोषित झाला आहे. कंगनाला हा पुरस्कार ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी जाहीर झाला असून एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
‘मणिकर्णिका’, ‘पंगा’साठी कंगना राणावतला मिळाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
इंग्रजांविरोधात राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत दिलेल्या लढाईची कथा सांगणाऱ्या ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’मध्ये कंगनाने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण कंगनाच्या चित्रपटातील अभिनयाचे यामधून कौतुक झाल्याचे पाहयला मिळाले. त्याचप्रमाणे २४ जानेवारी २०२० रोजी पंगा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये कंगनाने जया निगम या महिला कब्बडी खेळाडूची भूमिका साकारली आहे.
यापूर्वी २००८ साली मधुर भंडारकर दिग्दर्शित फॅशन चित्रपटासाठी कंगनाला सर्वोत्तमच सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच २०१४ साली क्वीन तर २०१५ साली तन्नू वेड्स मन्नू चित्रपटासाठी कंगनाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे तिला २००६ च्या गँगस्टर चित्रपाटासाठी पदार्पण करणारी सर्वोत्त अभिनेत्री, फॅशनसाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री, क्विनसाठी सर्वोत्तम अभिनेत्री, सर्वोत्तम अभिनेत्री (क्रिटीक) असे चार फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत. भारत सरकारने कंगनाला पद्मश्री हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक सन्मान देऊनही यापूर्वीच गौरवले आहे. कला आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी कंगनाला भारत सरकारने हा पुरस्कार प्रदान केला आहे.