महागड्या गाड्या, पैसे मोजण्याच्या मशीनमुळे सचिन वाझे आणखी गोत्यात


मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्कॉर्पियो कारमध्ये सापडलेल्या स्फोटक प्रकरणातील मुख्य संशयित पोलीस अधिकारी सचिन वाझे आता आणखीनच गोत्यात येण्याची शक्यता आहे. कारण, एनआयएच्या तपासात सचिन वाझे यांच्याकडे असणाऱ्या अलिशान गाड्यांची माहिती समोर आल्यामुळे आता सचिन वाझे यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) वक्रदृष्टी झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आता सचिन वाझे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची ‘ईडी’कडून चौकशी होऊ शकते. अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात सचिन वाझे यांच्याकडून मर्सिडीज, प्राडो यासारख्या अलिशान गाड्यांचा वापर झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक असणाऱ्या सचिन वाझे यांनी एवढ्या महागड्या गाड्या कशा घेतल्या, त्यासाठी त्यांच्याकडे पैसा कुठून आला? सचिन वाझे यांनी गाडीत पैसे मोजण्याचे मशीन का ठेवले होते?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्यामुळे सचिन वाझे यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या तपासाचे प्रकरण एनआयए ‘ईडी’कडे देऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.