महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याऐवजी केंद्रातील सरकारच बरखास्त करा : संजय राऊत


मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याऐवजी केंद्रातील मोदी सरकारच बरखास्त केले पाहिजे. राज्याच्या स्वायत्ततेवर केंद्राकडून घाला घातला जात असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, अनिल देशमुखांचे काय होणार, हा महाराष्ट्रापुढील किंवा देशासमोरील महत्वाचा प्रश्न नाही. सरकारवर मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांच्या खांद्यावर बंदुक ठेवून निशाणा साधला जात असल्याचे ते म्हणाले. संजय राऊत पुढे म्हणाले की, परमबीर सिंह यांच्यावर एकेकाळी शंका उपस्थित करणारे आज त्यांचा वापर करुन तोफा उडवत आहेत. विरोधकांचे परमबीर सिंह हे महत्वाचे शस्त्र आहे. आमच्यात केंद्रीय तपास यंत्रणांविषयी दुमत नाही. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात घुसत असून हा महाराष्ट्रावर घाला आहे. शरद पवार यांचेही याबाबत तेच मत आहे. पण एकदा तपास सुरु केल्यावर त्यांना सहकार्य करायला पाहिजे, जे आम्ही करत असल्याचे राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत. तोपर्यंत सर्वच प्रकरणांची निष्पक्षपणे आणि दबावाशिवाय चौकशी होईल. जो निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा तो ते घेतील. विरोधकांच्या बेछुट आणि बेफाम आरोपांमुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला तडा जाणार नाही. राज्याच्या जनतेला कळून चुकले आहे की विरोधाचे राजकारण करायचे आणि केंद्राच्या तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवायचे. त्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून माहोल तयार करायचा. केंद्रीय तपास यंत्रणा ढगातून पडलेल्या आहेत का?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

दरम्यान राष्ट्रपती लागू करण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली, याबाबत विचारले असता ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रकाश आंबेडकर हे नातू आहेत. बाबासाहेब घटनाकार आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात किती श्रद्धा आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, असे प्रकाश आंबेडकर सांगत असतील, तर त्यांनी पुन्हा एकदा घटनेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण ज्या प्रकारे खोटी-नाटी प्रकरणे निर्माण करून विरोधी पक्ष राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणत आहे किंवा एक केस बनवत आहे. यामुळे राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही किंबहुना केंद्रातील मोदी सरकार बरखास्त केले पाहिजे. कारण हा राज्याच्या स्वायत्तेवर घाला असल्याचे संजय राऊत म्हणाले.