उत्तराखंडमधील कुंभमेळ्यावर कोरोनाचे सावट; दररोज आढळत आहेत १० ते १२ कोरोनाबाधित भाविक


डेहरादुन – कोरोनाचे सावट उत्तराखंडमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर असून हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आढाव्यानंतर कुंभमेळा काळात कोरोनाचा उद्रेक होण्याचा इशारा दिला आहे. दररोज १० ते १२ स्थानिक नागरिक आणि १० ते २० भाविक कोरोनाबाधित आढळून येत असून, त्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारला केंद्राने इशारा दिला आहे.

कोरोनाची दुसरी लाट देशात आलेली असतानाच्या काळातच कुंभमेळा होत असल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय पथकाने हरिद्वार येथे होत असलेल्या कुंभमेळ्यात येणाऱ्या लोकांसाठी करण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तराखंडच्या सचिवांना पत्र पाठवून खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.

१२ राज्यांतून भाविक हरिद्वारमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याला येऊ शकतात. तर दुसरीकडे कुंभमेळा जवळ येत असतानाच दररोज १० ते १२ स्थानिक नागरिक आणि १० ते २० भाविक कोरोनाबाधित आढळून येत असल्याचे केंद्रीय पथकाने नमूद केले आहे. कुंभमेळ्यातील शाही स्नानानंतर स्थानिकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन रुग्णसंख्येचा उद्रेक होऊ शकतो, असे उत्तराखंडच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे.

कोरोनाबाधित आढळून येत असल्याने पॉझिटिव्ही रेट वाढण्याची भीती आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्यामुळे दिवसाला ५० हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि ५ हजार आरटीपीसीआर चाचण्या पुरेशा नाहीत. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोना चाचण्या वाढवण्यात याव्यात. त्याचबरोबर भाविकांबरोबरच स्थानिक नागरिकांच्याही चाचण्या करण्यात याव्यात, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तराखंड सरकारला सांगितले आहे.