अॅपलला आयफोनसोबत चार्जर न देणे पडले 14 कोटींना


ब्राझील – आपल्या आयफोन 12 सीरीजच्या फोनची चार्जरशिवाय विक्री करणे जगातील दिग्गज फोन मेकर कंपनी अ‍ॅपलला चांगलेच महागात पडले आहे. 9to5Google यासंदर्भात दिलेल्या रिपोर्टनुसार, अ‍ॅपलला 2 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 14 कोटींचा दंड ब्राझीलमधील ग्राहक संरक्षण संस्था प्रोकॉन- एसपीने ठोठावला आहे. आयफोन-12 सह चार्जर न दिल्याने अ‍ॅपल कंपनीला हा दंड ठोठावण्यात आला आहे. अ‍ॅपलने हा निर्णय घेताना पर्यावरणाचा फायदा होणार आहे, असे म्हटले होते. पण आता त्यांच्या या निर्णयामुळे पर्यावरणाचा फायदा होतो, हे सिद्ध होऊ शकले नाही असे प्रोकॉन- एसपीने म्हटले आहे.

हँडसेटसह अ‍ॅपलने चार्जर दिला नाही. तरीदेखील फोनची किंमत कमी का केली नाही, असा प्रश्नही प्रोकॉन-एसपीने उपस्थित केला. चार्जरशिवाय आणि चार्जरसह फोनची किंमत किती असेल याची माहिती अ‍ॅपलने दिली नाही. बॉक्समध्ये युजर्सना चार्जर न दिल्याने वातावरणाचा कसा आणि किती फायदा झाला, असा प्रश्न प्रोकॉन-एसपीने विचारला. पण याबद्दल अ‍ॅपलने कोणतीही माहिती दिली नाही. आयओएस युजर्सनी अपडेट केले त्यानंतर त्यांच्या फोनमध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. या अडचणीबाबतही युजर्सची कोणतीही मदत अ‍ॅपलने केली नसल्याचेही प्रोकॉन- एसपीने म्हटले आहे.

ग्राहक संरक्षणाविषयी ब्राझीलमध्ये नियम कठोर आहेत. गेल्या वर्षी अ‍ॅपलने ‘आयफोन 12’ लाँच केला होता. नवीन मॉडेल चार्जरसह येणार नाही. तसेच बॉक्समध्ये तुम्हाला इयरबड्सही मिळणार नसल्याचे कंपनीने म्हटले होते. ई-वेस्टच्या (इलेक्ट्रॉनिक कचरा) त्रासापासून पर्यावरणाला वाचवायचे आहे, याकरिता असा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले होते. अ‍ॅपलच्या या निर्णयाचे अनुकरण सॅमसंग कंपनीदेखील करणार आहे.