कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यासहीत ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल


पुणे : शनिवार मुख्यमंत्र्यांना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले आहे. हे पत्र समोर आल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत रविवारी राज्यभरामध्ये आंदोलने केली. राज्यभर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने सुरू करण्यात आली आहेत. पुण्यात देखील रविवारी आंदोलन करण्यात आले होते. पण या आंदोलनप्रकरणामध्ये आता कोरोना कालावधीतील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासहीत ४० ते ५० जणांविरोधात विश्रामबाग पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परमबीर सिंग यांचे पत्र शनिवारी सायंकाळी समोर आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी अलका चौकात पुणे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कोरोना काळात एका ठिकाणी गर्दी होता कामा नये, असा शासन आदेश असतानाही या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये चंद्रकात पाटील यांच्यासहीत ४० ते ५० जणांच्या नावांचा समावेश आहे.


पाटील यांनी या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही राजीनाम्याची मागणी केली होती. पाटील यांनी आंदोलनाच्यावेळी माध्यमांशी बोलताना, गृहमंत्री अनिल देशमुख हे जर राजीनामा देत नसतील तर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचा राजीनामा देण्यास भाग पाडले पाहिजे. हा विषय देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केल्यावर विधानसभा अनेक वेळा तहकूब झाली. यामुळे परमबीर सिंग यांच्या कालच्या पत्रामुळे वर्षभर असाच तमाशा चालू होता, हे स्पष्ट झाले आहे. तसेच सभागृहात देखील सचिन वाझेला वाचविण्याचे काम अनिल देशमुख यांनी केले असून, या संपूर्ण प्रकरणी देशमुख हे देखील दोषीच असल्यामुळे त्याचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली होती.