सोने असली की नकली? घरीच करा अशी परीक्षा
सोने खरेदी हा भारतीय लोकांचा आवडता उद्योग आहे. शुध्द सोने २४ कॅरेटचे असले तरी दागिने बनविताना २४ कॅरेटचे दागिने घडत नाहीत. त्यामुळे त्यात अन्य धातू मिसळून दागिने घडविले जातात. आपण खरेदी करतो ते सोने असली आहे की नकली हे नुसते पाहून समजणे शक्य नसते पण घरच्या घरी काही टेस्ट करून सोन्याची शुद्धता तपासता येते.
सरकारने ग्राहकांना असली सोन्याचे दागिने मिळावे याची खात्री पटावी म्हणून हॉलमार्क सुविधा दिली आहे. हॉलमार्क असलेले दागिने शुद्ध सोन्याचे आहेत याची खात्री देता येते. पण ग्राहक हॉलमार्क साठी वेगळे पैसे मोजावे लागतात म्हणून नेहमीच्या सोनाराकडून हॉलमार्क नसलेले दागिने खरेदी करण्यास प्राधान्य देतात असेही दिसून येते. अश्या दागिन्यातून ग्राहकाची फसवणूक होण्याची शक्यता असते.
यासाठी आपण सोन्याच्या दागिन्यावर लोहचुंबक ठेऊन त्याची तपासणी करू शकतो. सोने खरे असले तर दागिना लोहचुंबकाला चिकटत नाही. तसेच दागिन्यांवर गंज येतोय असे आढळले तरी हे सोने असली नाही हे ओळखता येते. खऱ्या सोन्याला कधीच गंज लागत नाही.
एका भांड्यात दोन ग्लास पाणी घालून त्यात दागिना टाका. तो तरंगत असेल तर सोने शुद्ध नाही पण दागिना थेट तळात गेला तर सोने असली आहे असा अंदाज करता येतो. दागिना दाताने काही वेळ दाबून धरावा. त्यावर दाताचे वण उठले तर सोने खरे आहे. सोने हा धातू नरम असतो त्यामुळे दाताने दाबले तर त्यावर वळ उठतात. घरात व्हिनेगर असले तर त्याचे दोन थेंब दागिन्यावर टाका. सोने शुद्ध असले तर दागिन्याचा रंग बदलणार नाही मात्र भेसळ असेल तर व्हिनेगरचे थेंब टाकलेल्या भागाचा रंग बदललेला दिसेल.