रॉयल एनफिल्डची नकली चीनी आवृत्ती हॅनवे जी ३० बाईक

भारताच्या लोकप्रिय रॉयल एनफिल्ड हिमालयन बाईकची डुप्लीकेट चीनी कॉपी हॅनवे जी ३० नावाने चीनी बाजारात दाखल झाली असून या बाईकची किंमत आहे १ लाख ९२ हजार रुपये. दिसायला ही बाईक अगदी रॉयल एन्फिल्ड सारखी आहे. तिला अधिक आकर्षक बनविण्यासाठी एलईडी लाईट, फुल डिजिटल स्क्रीन व आपसाईड डाऊन फ्रंट फोर्क्स दिले गेले आहेत. कामगिरीच्या दृष्टीने मात्र ही चीनी बाईक रॉयल एनफिल्डच्या पासंगाला कुठेच पुरणारी नाही. इंटरनेटवर या बाईकचे फोटो दिले गेले असून ही अॅडव्हेंचर्स बाईक असल्याचे म्हटले गेले आहे.

चीनी ऑटो बाजार विविध प्रकारच्या कार्स आणि बाईक्सनी ओसंडून वाहत असतो आणि येथे वाहनाचे डिझाईन आणि लुकची हुबेहूब कॉपी करून वाहने बनविली जातात. चीनी डुप्लीकेट या नावाने हा सर्व व्यवसाय होत असतो. अगदी लोम्बर्गिनी पासून ते दुकाती पर्यंत हुबेहूब नक्कल केलेल्या वाहनांनी हा बाजार भरलेला आहे.

चीनी हॅनवे जी ३० बाईक रॉयल एनफिल्ड हिमालयनच्या तुलनेत टेक्निकली दुय्यम दर्जाची आहे. या बाईकला २४९ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले गेले आहे तर रॉयल एनफिल्ड हिमालयनचे इंजिन ४११ सीसी बीएस ६ नॉर्मसह आहे. फोर स्ट्रोक आणि ५ स्पीड गिअरबॉक्स ही रॉयल एनफिल्ड हिमालयनची आणखी काही वैशिष्टे आहेत.