मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यात ‘मुजीब जॅकेट’ मुख्य आकर्षण
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशाच्या सुवर्ण महोत्सवी स्वातंत्रदिनासाठी २६ आणि २७ अश्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर बांग्लादेश येथे जात आहेत. त्यांच्या या दौऱ्यात खादी पासून बनविलेले मुजीब जॅकेट हे मुख्य आकर्षणाचा विषय ठरले आहे. भारतीय उच्च्यायोगातील अधिकारी, बांग्ला मुक्ती संग्रामाचे प्रणेते आणि ‘फादर ऑफ नेशन’ म्हणून प्रसिध्द असलेले शेख मुजीबर रेहमान यांच्या सन्मानार्थ त्यांची खास ओळख असेलेले हे खादी जॅकेट परिधान करणार आहेत.
खादी ग्रामोद्योग आयोगाने अशी १०० जॅकेट त्यासाठी पुरविली असल्याचे खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी सांगितले. ते म्हणाले बांग्लादेशातील जुन्या पिढीसाठी ही जॅकेट त्यांच्या महान नेत्याच्या विचारधारेचे प्रतिक आहेत तर युवा पिढीसाठी फॅशन स्टेटमेंट आहेत. पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा राजकीय दौऱ्यावर परदेशात जातात तेव्हा नेहमीच खादी वापरण्यास प्राधान्य देतात. त्यांच्यामुळेच आज खादी जगभर लोकप्रिय बनली आहे.
२०१६ च्या गोवा येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेत सर्व ब्रिक्स नेत्यांनी खादी जॅकेट परिधान केली होती. मुजीब जॅकेटसाठी सहा बटणे असून खालच्या अर्ध्या भागात दोन खिसे, डावीकडे आणि पुढे पॉकेट डिझाईन केले गेले आहे.