डोनल्ड ट्रम्प स्वतःच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मच्या तयारीत
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प लवकरच स्वतःचा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म सुरु करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. ट्रम्प यांचा हा नवा प्लॅटफॉर्म येत्या तीन महिन्यात सुरु होईल अशी माहिती त्यांच्या वरिष्ठ सल्लागाराने दिली आहे.
वाशिंग्टन येथील कॅपिटल इमारतीवरील ६ जानेवारीच्या हल्ल्यानंतर ट्विटर, फेसबुक अश्या अनेक सोशल मिडिया साईटवरून ट्रम्प यांना निलंबित केले गेले होते. गुगल व अॅपलनी त्यांच्या स्टोरवरून ही सुरवात केली होती. नंतर फेसबुक, ट्विटर, युट्यूबने ट्रम्प यांचे अपलोड केलेले व्हिडीओ काढून टाकले होते. यावेळी ट्रम्प यांनी चॅनल सेवा नियम व अटींचे उल्लंघन केल्याचे कारण दिले गेले होते.
स्नॅपचॅटने युजर्सचे हित लक्षात घेऊन त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांच्यावर नेहमीसाठी बंदी घातल्याची घोषणा केली होती. ट्रम्प त्यांच्या अकौंटवरून सतत चुकीची माहिती आणि भडकाऊ वक्तव्ये, पोस्ट करत असतात असेही त्यात म्हटले गेले होते. युट्यूबने ट्रम्प यांनी अपलोड केलेल्या एका व्हिडीओ मुळे कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन केल्याचे कारण देऊन चॅनलवर ऑटोमॅटिक स्ट्राईक झाल्याचे सांगितले होते.
असा पाहिला स्ट्राईक किमान सात दिवसांचा असतो. त्यानंतर पुढचे सात दिवस ट्रम्प चॅनलवर व्हिडीओ अपलोड करू शकणार नव्हते. पण त्यानंतर युट्यूबने ट्रम्प यांचे अकौंट निष्क्रीय करून टाकले होते.